Saturday, 27 April 2013


पुणे जिल्ह्याची "फूड हब'साठी निवड
दळणवळणाची उत्तम व्यवस्था, पोषक वातावरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केंद्र सरकारच्या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने राज्यातील एकमेव पुणे जिल्ह्याची "फूड हब'साठी निवड केली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्याबरोबर व्याजात मोठ्या प्रमाणावर सवलतींचा लाभ मिळणार आहे. परिणामी, यातून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे. 

फळे व भाजीपाला उत्पादन क्षेत्रात जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो; परंतु त्यावरील प्रक्रियेमधील मूल्यवर्धनामध्ये भारताचे प्रमाण तीन टक्केही नाही. हे प्रमाण पाच ते सात टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट केंद्राने ठेवले आहे. त्यासाठी बाराव्या पंचवार्षिक योजनेत अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी भारतीय लघुविकास बॅंकेच्या माध्यमातून देशभरात "फूड हब' तयार करून त्यांना चालना देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे व त्यातून रोजगाराची निर्मिती करणे, असा दुहेरी उद्देश सरकारने ठेवला आहे. 

केंद्र सरकारच्या भारतीय लघुविकास बॅंक आणि "फूड प्रोसेसिंग' विभागाच्या वतीने यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात पुणे जिल्ह्यामध्ये अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठीचे पोषक वातावरण असल्याचे दिसून आले. त्यामुळे "फूड हब' म्हणून या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी "मिटकॉन'च्या वतीने फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment