अमेरिकेतील अध्यक्षीयपदाची निवडणूक दर चार वर्षांनी एकदा होते. ही निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारीच होते.अमेरिकेचा नागरिक हा कटिबद्ध इलेक्टर्सना आपले मत देतो आणि मग असे 'कटिबद्ध इलेक्टर्स' औपचारिकपणे आपली मते अध्यक्षीय उमेदवारास देतात.
मंगळवारच का?
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मतदानासाठी अनेक शेतकरी 'बग्ग्यांमधून' मतदानासाठी येत असत, यांपैकी अनेकांना फार दूर अंतरावरून यावे लागत असे. शनिवार हा आठवडय़ातील कामाचा अखेरचा दिवस असे आणि रविवार प्रार्थनेचा. परिणामी या दिवशी लोक प्रवास टाळत असत. बुधवारी आठवडय़ाच्या बाजाराचा दिवस असे. म्हणून पहिल्या सोमवारनंतर येणारा मंगळवार हा निवडणुकीचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.
काय आहे इलेक्टोरल कॉलेज ?
अमेरिकेत एकूण ५० राज्ये आहेत. अमेरिकेच्या 'प्रतिनिधीगृहातील' प्रत्येक राज्याच्या प्रतिनिधी संख्येनुसार त्या-त्या राज्याच्या 'इलेक्टर्स'ची संख्या निर्धारित केली जाते. याव्यतिरिक्त कोलंबिया या जिल्ह्य़ाकरिता ३ इलेक्टर्स निर्धारित करण्यात आले आहेत. या प्रत्येक 'इलेक्टर'ला एक मत असते. यानुसार प्रत्येक राज्यातील प्रतिनिधी संख्येइतकी मते प्रत्येक राज्याला असतात. याशिवाय प्रत्येक राज्याच्या सिनेटमधील २ प्रतिनिधींना आपले प्रत्येकी एक मत या निवडणुकीत देता येते. या सर्वाचे मिळून 'इलेक्टोरल कॉलेज' होते. सध्या एकूण ५३८ इलेक्टर्स असून २७० किंवा त्यापेक्षा अधिक इलेक्टर्सची मते मिळवणारा उमेदवार विजयी म्हणून घोषित केला जातो.
पॉप्युलर व्होट
जेव्हा प्रत्येक राज्यातील मतदार आपल्या पसंतीनुसार उमेदवारास मत देतात, तेव्हा प्रत्यक्षात ते आपल्या राज्यातील प्रतिनिधीने - 'इलेक्टर'ने नेमके कोणाला मत द्यावे हेच सुचवीत असतात. उदाहरणार्थ जर मतदाराने रिपब्लिक पक्षाच्या उमेदवारास मत दिले तर याचा अर्थ रिपब्लिक पक्षालाच मत देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या इलेक्टरला (कटिबद्ध इलेक्टर्स) त्याने मत दिले असा होतो. त्यामुळेच एखाद्या उमेदवाराने जर 'पॉप्युलर व्होटस्' जिंकली तर त्याने त्या राज्यातील सर्व इलेक्टर्सची मते जिंकली असा त्याचा अर्थ होतो.
डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह गाढवच का ?
१८२८ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रतिनिधी असलेल्या अँड्रय़ू जॅकसनला त्याच्या 'आता लोकांना राज्य करू द्या' या मतामुळे त्याचे टीकाकार 'जॅकॅस' (जॅक - गाढव) म्हणून संबोधत असत. याचा वापर जॅक्सनने पुढे मोठय़ा खुबीने केला. त्याने आपल्या प्रचारादरम्यान प्रतीक म्हणून 'गाढव' हेच चिन्ह वापरले.
No comments:
Post a Comment