Friday, 10 May 2013

नव्या पोपपदी 'प्रथम फ्रान्सिस'

चर्चच्या तेराशे वर्षांतील इतिहासामध्ये बदल घडवत पोपपदी अर्जेटिनाचे जॉर्ज बर्गोग्लिओ ऊर्फ नवे पोप 'प्रथम फ्रान्सिस विराजमान झाले.
एक अब्ज कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या पोपपदावर अर्जेटिनाचे जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ यांची बुधवारी चौथ्या फेरीतील मतदानानंतर निवड झाली. त्यांनी 'पोप प्रथम फ्रान्सिस ' असे नाम धारण केले असून ते रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे पोप आहेत. 
विशेष काय? 
मध्ययुगापासून आजवर पोपपदाचा सन्मान युरोपबाहेरील धर्मगुरूकडे गेलेला नव्हता. जेसुईट या कॅथलिक धर्माच्याच सर्वात मोठय़ा पंथाच्या पोपलाही यापूर्वी कधी धर्मप्रमुखपदाची माळ मिळाली नव्हती. त्यामुळे या दोन्ही गोष्टींसह पोपपदावर विराजमान झालेल्या जॉर्ज बर्गोग्लिओ यांची निवड वैशिष्टय़पूर्ण मानली जाते.
' प्रथम फ्रान्सिस' कोण?
मध्यमवर्गीय इटालियन स्थलांतरित कुटुंबात जन्मलेले जॉर्ज बर्गोग्लिओ साधी राहणी आणि उच्च विचारसरणीसाठी प्रसिद्ध आहेत. ब्युनोस आयर्स येथील लहानशा घरात राहणारे बर्गोग्लिओ चर्चमध्ये येण्यासाठी अथवा प्रवासासाठी सार्वजनिक वाहनाचा वापर करताना दिसत. स्वत:चे अन्न ते स्वत: शिजवितात आणि अर्जेटिना येथील झोपडपट्टी वस्त्यांमध्ये त्यांनी अव्याहत मदतकार्य केले आहे
आव्हाने काय?
कॅथलिक चर्चला आलेली अवकळा दूर करण्याचे सर्वात मोठे आव्हान ' प्रथम फ्रान्सिस ' यांच्यासमोर आहे. जगभरातील कॅथलिक चर्चची बदलत असलेली प्रतिमा, धर्मगुरूंच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी चर्चला फासलेला काळिमा, चर्चच्या धर्मगुरूंमधील दुभंगाची मानसिक अवस्था आणि शेकडो वर्षे ख्रिस्ती धर्माचे वर्चस्व असलेल्या ठिकाणांमध्ये चर्चचा घटत जाणारा प्रभाव आदीबाबत लक्ष देण्याची गरज आहे.
दक्षिण अमेरिकेत उत्साह का?
जगातील चाळीस टक्के कॅथलिक असलेल्या दक्षिण अमेरिकेच्या प्रतिनिधीला ख्रिस्ती धर्मातील सर्वोच्च धर्मगुरूपद मिळणे ही दक्षिण अमेरिकेसाठी उत्साहाची सर्वात मोठी घटना बनली.

No comments:

Post a Comment