Thursday 9 May 2013

जवानांच्या 'डीएनए' नोंदीची महत्त्वाकांक्षी योजना


अतिरेक्यांविरोधातील कारवायांत किंवा रणभूमीवर शहीद होणाऱ्या जवानांच्या मृतदेहाची तात्काळ ओळख पटावी, यासाठी लष्करातील सर्व जवानांच्या डीएनए तपशीलाची नोंद करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेतर्फे हाती घेतला जात आहे. या तपशीलाचे संकलन या सेवेच्या 'डाटा बँक'मध्ये अर्थात माहिती साठय़ात कायमस्वरूपी जतन केले जाणार आहे.

सध्या हा प्रकल्प प्रायोगिक पातळीवर पुण्याच्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने हाती घेतला गेला आहे. शरीरातील ऊतींनुसार जवानाची ओळख पटविण्याची प्रक्रिया प्रमाणबद्ध करणे आणि जवानांचा डीएनए तपशील संग्रहित करणे, ही कामे या महाविद्यालयाकडून सुरू आहेत. लष्करात ११ लाख जवान असून पुण्यातील प्रायोगिक पातळीवरील प्रकल्प पूर्णत्वास गेला की देशभर टप्प्याटप्प्याने तो कार्यान्वित होणार आहे.
जवानांच्या रक्ताच्या नमुन्यांचे संकलन, जतन आणि त्यांचे आवश्यक त्या प्रयोगशाळांमध्ये स्थानांतर यासाठी काही नियमावली व कार्यपद्धती निश्चित करणे, जवानांच्या व्यक्तिगत माहितीत अचूकता राखणे, नमुन्याची अचूक नोंद करणे आणि जवानाच्या शरीराच्या कोणत्याही भागातील ऊतींद्वारे त्याची ओळख पटविणारी प्रक्रिया निश्चित करणे; ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत. पुण्यातील प्रायोगिक प्रकल्प २०१४ पर्यंत पूर्णत्वास जाईल.
सैनिकांच्या डीएनए नोंदजतनाची गरज अमेरिकेला ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यानंतर प्रथम वाटली. आज अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करांनी आपल्या सैनिकांचे डीएनए तपशील जतन केले आहेत.

No comments:

Post a Comment